इलॉन मस्कच्या इंटरनेट कंपनीवर भारत सरकारने बंदी का घातली?
इलॉन मस्क
अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट कंपनीवर भारत सरकारने बंदी घातली आहे.
स्टारलिंक ही कंपनी स्पेस एक्स कंपनीचा भाग आहे. लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईटच्या माध्यमातून ब्रॉडबँड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचं काम ही कंपनी करते.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने शुक्रवारी (26 नोव्हेंबर) संध्याकाळी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितलं की, स्टारलिंक कंपनीला भारतात तत्काळ प्रभावाने इंटरनेट सेवा बुकींग करणं तसंच सेवा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
तत्पूर्वी, भारतात स्टारलिंक कंपनीचे संचालक संजय भार्गव यांनी सोशल मीडियावर सांगितलं होतं की देशात या सेवेचा वापर करण्यासाठी 5 हजारपेक्षा जास्त लोकांना अॅडव्हान्स बुकिंग केली आहे.
भारतातील ग्रामीण भागात ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी काम करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
स्टारलिंक कंपनीला भारतात डिसेंबर 2022 पासून 2 लाख डिश टर्मिनलच्या माध्यमातून ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू करायचं होतं.
स्पेस एक्स कंपनीने जगभरात इंटरनेट सेवा देण्यासाठी आतापर्यंत 1700 सॅटेलाईट अंतराळात प्रस्थापित केले आहेत. अशा प्रकारचे लाखो सॅटेलाईट अंतराळात पाठवण्याचा त्यांचा विचार आहे.
भारत सरकारने स्टारलिंकला का थांबवलं?
भारत सरकारने स्टारलिंक कंपनीला इंटरनेटची सेवा देण्यापासून रोखलं आहे. कारण त्यांना अजूनपर्यंत अशा प्रकारची सेवा देण्याचा परवाना मिळालेला नाही. विनापरवाना ही कंपनी देशात सॅटेलाईट आधारित सेवा देऊ शकत नाही.
कंपनीने विनापरवाना आपल्या सेवेची बुकिंग आणि सेवेशी संबंधित जाहिरातींचं प्रसारण सुरू केलं आहे. त्यानंतर लोकांनी याची बुकींगही सुरू केली होती.
यासंदर्भात केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं, "स्टारलिंकला भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याचा परवाना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे लोकांनी त्यांच्या सेवेचं सबस्क्रिप्शन घेऊ नये."
सरकारने कंपनीला नियमांचं पालन करत सर्वप्रथम परवाना घेण्याची सूचना केली आहे.
लो अर्थ ऑर्बिट इंटरनेट सेवा काय आहे?
स्टारलिंक कंपनी इंटरनेट सेवा देण्यासाठी लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईटचा वापर करते. हे सॅटेलाईट पृथ्वीपासून सुमारे 550 किलोमीटर उंचीवरून वेगाने फिरत फक्त 90 मिनिटात पृथ्वीभोवती एक फेरी घेतात.
या यंत्रणेत उपभोक्तांकडे छोट्या आकाराचा डिश अँटेना दिला जातो. सॅटेलाईटने पाठवलेले सिग्नल हा अँटेना प्राप्त करतो.
या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी वायरच्या वापराविना वापरकर्त्यांपर्यंत इंटरनेट पोहोचतं.
सध्या याची चाचणी प्राथमिक स्वरुपातच सुरू आहे.
या सेवेचा वापर करणाऱ्या लोकांच्या मते, या सेवेचं डाऊनलोड स्पीड 150 ते 200 MBPS आहे. तर अपलोड स्पीड 10 ते 20 MBPS आहे.
फेब्रुवारी महिन्यात स्टारलिंक कंपनी आपला इंटरनेट स्पीड दुप्पट म्हणजेच 300 MBPS करेल, अशी घोषणा ट्विट करून केली होती.
सॅटेलाईट इंटरनेट सेवा देणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी स्टारलिंक एक आहे.
याशिवाय, इतर अनेक कंपन्या आणि सरकार या क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहेत.
यामध्ये अॅमेझॉन, कॅनडाची टेलिसॅट, वनवेब यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
भारतात या कंपन्यांची स्पर्धा रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांसारख्या कंपन्यांसोबत असेल.
इंटरनेट गुणवत्ता कशी असेल?
सॅटेलाईट इंटरनेटच्या वापरकर्त्यांना याचा फायदा होईल का, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असेल.
तज्ज्ञांच्या मते, आजूबाजूला किती डिश असतील, हे यामध्ये महत्त्वाचं आहे. एकाच वेळी अनेक वापरकर्त्यांना चांगला स्पीड मिळू शकणार नाही. अशा स्थितीत युझर्सना ड्रॉपआऊटच्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं.
तज्ज्ञांच्या मते, एक साधारण मात्र विश्वसनीय इंटरनेट कनेक्शन हे वेगाने पण अडकत-अडकत चालणाऱ्या सेवेपेक्षा कितीतरी पटींनं बरं असतं.
Comments
Post a Comment